बातम्यासामाजिक कट्टा

मनाला वेदना देणारा प्रवास.

परीक्षेच्या काही दिवस अगोदर हॉल तिकीट आले. पुण्याधील पिंपरी चिंचवड येथे मला जायचे होते. रिझर्वेशन मिळणे अवघड होतेच पण तात्काळ भेटणे सुध्दा अवघड. त्यामुळे आई, वडील, बहीण सर्वजण म्हणत होते की ट्रॅव्हल्स किंवा बस ने जा. पण पैशे वाचवण्याचा प्रयत्नात मी जनरल डब्याने (रेल्वे) जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हे बहिणीला समजले तेव्हा तिने मी लिहिलेल्या लेखाची आठवण करून दिली की ‘भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उदार होणे गरजेचे आहे ‘ असे तुझे मत आहे. मग जनरल डब्याचा प्रवास का करत आहेस. तिचे बोलणे योग्य होते पण तो नियम : “जे कमवतात त्यांच्या साठी लागू आहे आणि जे अजून विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी लागू नाही”. असे माझे मत मी ऐकवले  आणि निघालो प्रवास करायला.

 ठरल्याप्रमाणे मी जनरल डब्याचे टिकीट काढले ११० रूपये उस्मानाबाद ते पूणे आणि मनाला वेदना देणारा प्रवास सूरू झाला.

          प्रचंड गर्दी लहान लेकरांपासुन ते वयस्कर लोक, सर्वजण या जनरल डब्यात प्रवास करत होती. काही जण नौकरी साठी, काही जण ‍फिरायला, काही जण शिक्षणासाठी, काही जण मुला-मुलींना भेटण्यासाठी, काही जण काम शोधण्यासाठी, काही जण दवाखान्यात जाण्यासाठी, काही जण व्यापार करण्यासाठी, काही जण परीक्षा देण्यासाठी. जनरल डब्यामध्ये साधारण ७० ते १०० सीटस असतात. पण त्या डब्यामध्ये  दुप्पट किंवा कधी कधी तिप्पट प्रवासी प्रवास करत असावे. वर्णन कसे करावे मला समजत नाही. एवढा त्रास सहन करत ही माणसे आपला प्रवास करतात. काही जण टॉयलेट च्या बाजूला बसून प्रवास करतात. प्रत्येक जण टॉयलेट करायला येतात आणि टॉयलेट च्या आसपास बसणाऱ्यांना सर्व त्रास सहन करावा लागतो. काही जण उभारून पूर्ण रात्र प्रवास करतात, काही जण येण्या जाण्यासाठी असलेल्या मोकळया जागेत बसतात. काही जण डब्याचा दरवाजा जो असतो तेथे असणाऱ्या पायऱ्‍या जवळ रात्रभर प्रवास करतात. काही जणांना तर एका पायावर प्रवास करावा लागतो, दुसरा पाय ठेवायला सुध्दा जागा नसते. मजेची गोष्ट सांगायची तर काही जण टॉयलेट मध्ये बसून पूर्ण प्रवास करतात  जो पर्यत त्यांचे स्टेशन येत नाही  तोपर्यत ते दार काय उघडत नाहीत. मग कोणाला समजा टॉयलेट वापरायचं असेल तरी ते दार काय उघडत नाहीत. काही माणसे तर सीटाच्या खाली असलेल्या रिकात्या जागेत चक्क झोपतात.

   कधी कधी एवढी गर्दी होते की मधल्या माणसांना श्वास घेणे सुध्दा अवघड होउन बसते. पूर्ण अंग ताटून येते. तासनं तास शरीर हालवू शकत नाही. एका जागेवर रात्रभर उभे रहावे लागते समाधी घेतल्यासारखे. एवढे जवळ एकमेकांच्या उभे असतात की काहीजणांच्या शरीराचा वास सहन करावा लागतो.

 असे वाटते की कधी माझे स्टेशन येईल आणि येथून मी बाहेर पडेन. मनाला प्रचंड वेदना सोबत हा प्रवास करावा लागतो.

कमी पैशाचे तिकिट काढले म्हणजे आमच्या बरोबर असा भेदभाव. निदान कमीत कमी आमचे बुड टेकवण्यासाठी तर जागा दयायला पाहिजे. एवढा अन्याय आमच्या वर का करतात तुम्ही..आम्ही पण माणूसच आहोत ना..आम्हाला का अशा प्रकारे तुम्ही वागणूक देतात..का एवढ्या वेदना..भारतातले सगळे जण श्रीमंत नसतात ! म्हणून काय तुम्ही या प्रकारे आम्हाला वागवणार.. जर जागा नसेल गाडीमध्ये, गाडी पूर्ण भरत असेल तर दुसरी गाडी सोडायला पाहिजे ना..म्हणजे जेवढे सीट आहेत त्यापेक्षा जास्त पैशे पण तुम्ही कमवतात आणि आम्हाला साध बुड टेकवण्यासाठी सुध्दा जागा नाही..

  किती सहन करायचे सामान्य् माणसांनी. थोडासा तरी आदर दया..नाही सहन होत हा मनाला प्रचंड वेदना देणारा प्रवास..

आम्हाला आमचा अधिकार पाहिजे, आता या वेदना सहन होत नाहीत..माणसाला माणसाप्रमाणे वागवा..राज्यघटनेत सुध्दा सांगितलेलेच आहे की प्रत्येक माणसाला समान न्याय मिळाला पाहिजे.. हा कुठला न्याय तुमचा ..सरकार जर असा भेदभाव करत असेल तर बाकीचे खाजगी वाले माणसाला माणसाप्रमाणे वागवतील का ?

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!